‘सहस्त्रचंद्र दर्शनाच्या उंबरठ्यावर’ (माजी विद्यार्थीनी मनोगत)
🏫
बऱ्याच वर्षांपासून शिक्षणात आणि मग संसारात रोज दररोजच्या कामात मग्न झालेल्या मला एक दिवस अचानकच दुपारच्या वेळेत मोबाईलची रिंग वाजली. माझ्या दोन वर्षाच्या मुलीला जेवण भरवता भरवता फोन रिसीव केला.
” सारडा बोलतेस का?” मी एकदम हातातलं काम सोडून हात एकमेकांवर झटकून पटकन गॅलरीत येऊन बोलले हो हो मी सारडाच… हडबडण्याच कारण असं की लग्नानंतर किंवा दहावीच्या शिक्षणानंतर कधीही मला कोणी माहेरच्या आडनावांनी हाक मारणं मला अपेक्षितच नव्हतं..
मग इनविटेशन दिलं ते ‘सहस्त्रचंद्र दर्शन च्या उंबरठ्यावर’ कार्यक्रमाचे.. 1946 ते 2024 पर्यंतच्या श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालया च्या माजी विद्यार्थिनी चा एक भव्य गेट-टुगेदर..
बघता बघता तारीख जवळ येत होती आणि जो मोबाईल मध्ये शाळेचा एक इन ऍक्टिव्ह ग्रुप बनला त्यामध्ये जरा गडबड गोंधळ सुरू झाली. कोण कोण येणार? कधी येणार? आणि माझ्या बॅचचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या लहान बछड्यांना घेऊन यायचं आहे की घरी ठेवायचं?😅
शाळेला भेटण्याची भन्नाट उत्सुकता असणारी मी घरात दोन दिवसापासूनच सांगून ठेवलेले’ मला तीन तारखेला जायचे आहे आणि आनिका (माझी मुलगी)घरीच राहील..
मी एकटीच जाणार आहे ते पण दिवसभरासाठी…
सकाळी आरशासमोर तयार होतानाच हजारो आठवणी पिंगा घालू लागल्या… आपल्या बॅचचे कोण कोण येईल?? दिवस कसा जाईल? जरा छानच आवरावं म्हणजे सगळ्यांसोबत छान फोटो काढता येईल ,असे एक ना अनेक विचार स्वतःशीच बोलू लागले..
हजारो आठवणींनी हृदयाला आलिंगन घातलेलं होतं, शाळेच्या रस्त्यावर मला शाळेच्या प्रत्येक क्षणाची आठवण करून देत होती..
शाळेत पाय ठेवताच जेव्हा ढोल,ताशा पथकांच्या गजरात आणि कुंकू लावून ,फुलांच्या पाकळ्यांनी झालेलं स्वागत जणू माहेरी गेलेल्या मुलीच्या स्वागताची तयारी मनाला गुंफण घालत होती..
आपल्यालाच शिकवणाऱ्या शिक्षिकांनी जेव्हा आपलं हात जोडून स्वागत केलं, तेव्हा डोळे भरून कधी आले कळालंच नाही..🥹
शाळेतला पहिलाच क्षण मला वेळ थबकली आहे असं वाटायला लावणारा होता. त्या परिचित वातावरणात पाय ठेवताना मन एक वेगळ्याच आनंदात हरवलं होतं. वर्गखोल्या, काळा फळा, आणि प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या आठवणींनी मनाला हळवं केलं.
कार्यक्रमासाठी सगळ्याजणी हळूहळू जमायला लागल्या. बऱ्याच जणींना सुरुवातीला ओळखता येणं कठीण गेलं—चेहरे बदलले होते, पण डोळ्यांतील ओळख तशीच होती. पहिला प्रश्न कायमचाच, “अगं ओळखलंस का?” आणि मग हसून गप्पांची भेंडोळी उलगडायला लागली.
सहस्त्रचंद्रदर्शनाच्या या सोहळ्यात शाळेच्या आठवणींच्या तळाशी गेलेलं आमचं बालपण पुन्हा एकदा जिवंत झालं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला जुने फोटो दाखवले गेले. जुन्या गट-फोटोंमधून आपल्या चेहऱ्याचा शोध घेताना हसून डोळे पाणावले. शिक्षकांचे मनःपूर्वक आशीर्वाद ऐकताना आणि त्यांचं आपल्याकडे बघण्याचं कौतुक पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळाला.
कार्यक्रमाच्या दरम्यान जुन्या आठवणींवर गप्पा मारताना, आपल्याच शाळेतील टपरीवर खाल्लेल्या वडापावपासून ते नाटकांच्या सरावात केलेल्या मस्तीपर्यंत सगळं आठवत होतं. आमच्या बॅचचा मस्तीखोर गट परत तयार झाला आणि न थांबणाऱ्या गप्पांत दिवस कधी संपला कळलंच नाही..
शाळेने आपल्याला किती काही दिलं आहे, हे कदाचित आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समजतं. पण संमेलनात त्या आठवणींना स्पर्श करता येतो, आणि हृदय भरून येतं. “आमची शाळा, आमची माणसं” हे शब्द अजूनही आपलं स्थान पकडून ठेवतात.