✍️शब्दांच्या संवेदना…✍️
✍️शब्दांच्या संवेदना…✍️
————————————————-//
शब्दांची किमया लयभारी
शब्दांची लीलया खुप न्यारी
रंगहीन जीवनाला
शब्दांनी करता येते रंगरंगोटी
शब्दाविना कल्पना
कल्पकतेची दुनियाच वांझोटी
कधी कुणाला डोकावता आले का शब्दापलिकडे…?
चंद्रसूर्याला हि शब्द कवेत घेती
शब्दांचे सामर्थ्य किती महान…
शब्दांनिच माणसांच्या कत्तली
आणि दंगली सुद्धा पेटती
खरंच शब्द हे किती बलवान…
शब्द फुलणाऱ्या प्रेमाचा सुगंधी श्वास
शब्द प्रेयसीसाठी सुखद क्षणांचा सहवास
शब्द प्रियकराच्या तुटलेल्या काळजाची आस
शब्द खिन्न काळोखात प्रकाशाचा भास
शब्द क्रांतिसाठी विद्रोहाचा ध्यास
शब्द पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयास
शब्द प्रेम,वेदना,विरह जगण्याची परिभाषा
शब्द प्रथमच उचारणाऱ्या
इवल्याश्या तान्हूल्याची मातृभाषा
शब्दांनीच मोकळा होतो
अन्तःकरणात दाटत असलेला कोलाहल
शब्दांनीच पचवता येतो
व्यवस्थेचा राग आणि संतापाचा हलाहल
कधी कधी शब्दच ठरतात विध्वंसक…
शब्द जिवाची लाई लाई
मनाचा नाहक त्रागा…
शब्दच उसवलेल्या नातीगोत्यांना
शिवण्याचा अतूट धागा…
शब्द राग, लोभ, द्वेष तिरस्कार
शब्दांनीच तर साहित्याला पुरस्कार
शब्दांनीच बदलले आदिम माणसांचे वर्तन
शब्दांनीच घडवले हृदयांचे महापरिवर्तन
शब्दांच्या विचारांनीच घडली जगात क्रांति
आणि चहुकड़े पसरली
बुद्धाच्या अहिंसेची करुणामय शांती
शब्द शब्द तुक्याची बुडवलेली गाथा
कबीराच्या दोह्यानी शांत व्हावा माथा
खरंच…!
शब्दांची किमया लयभारी
शब्दांची लीलया खुप न्यारी
मी मात्र शब्दांच्या अतीव वेदनेनी ग्रस्त आहे
कारण मी तुला कधीच शब्दात मांडू शकलो नाही
तू कधीच माझ्या शब्दात बंदिस्त होवू शकली नाही
तुझ्याबद्दलच्या माझ्या शब्दांच्या संवेदना
अशाच जिवंत राहतील चिरकाल…!
तू असतांना सुद्धा…
मी नसतांना सुद्धा…
———————————————————//
✍️”अशांत”शेखर✍️
06/05/2022