✍️”बारिश भी अक्सर भुख छीन लेती है”✍️
✍️”बारिश भी अक्सर भुख छीन लेती है”✍️
————————————————————————//
साधारण आपल्याकडे जून महिन्यात शाळेला सुरुवात होत असे शाळा कासवाच्या गतिप्रमाणे पुढे सरकायची म्हणजे पहिला आठवड्यात पूर्ण वर्ग होतच नसायचे कारण मास्तर, मुख्याध्यापक हे वेळेवर कुठे रुजू व्हायचे? विद्यार्थ्यांची पण हजेरी नगण्यच… त्यामुळे आमची पण मज़ाच शाळेच्या नावाने हुंदळत बसायचो कधी सिनेमा गृहात लावलेल्या पोस्टर आताचे ट्रीज़र फोटो पाहत बसायचो कारण त्याला टिकिट नसायची अगदी मोफत… तर कधी वन विभागाच्या डेपो मधे झाडांच्या सावलित रमायचो. साधारण एक महिन्या नंतर मग कुठे हळूच वेळापत्रक यायचे पण पुस्तके वह्या लेखणी मात्र कधीच वेळेवर मिळत नसायच्या.पुस्तक वह्यांचे वेळापत्रक फिस्कट जायचे मग मास्तरच्या छड्या नाहीतर कोबंळा आणि शिव्या ह्या पाचविला पूजल्या असायच्या बर्र मास्तर कधी जाणून घ्यायचाच नाही कि काय कारण असेल!त्याला काही घेणे देणे नसायचे.. तू गरीब की श्रीमंत.. शहरातला की खेड्यातला.. बामन की महार.. कुनबी की चाँभार..तेली की ताम्बोळी.. काही काही नाही अगदी राज्यघटनेप्रमाणे समता समानता..! पण वह्या पुस्तके वेळेवर दिसली नाही की धपाटे नक्कीच..! तेव्हा मात्र तो क्रूर वाटायचा अगदी इतिहासतल्या हिटलर सारखा किंवा भाषारचनेच्या विषयातल्या सुवर्णमृगाचा वेष धारण करणाऱ्या मारीच राक्षसा सारखा ह्या समस्त खल पात्रांची ओळख पुस्तकांच्या पानातूनच घडली.. तेव्हा मला मात्र माझा बाप ही खलपुरुषासारखा भासायचा,खुप राग यायचा मला माझाच. त्यावेळी पुस्तकासाठी मार खातांना आता माझ्या मनाला सतत प्रश्न पडत असतो की मास्तराच्या मनात राज्यघटनेप्रमाणे बंधुभाव का निर्माण होत नसावा विद्यार्थ्यांनप्रती… ?पण प्रश्न असाही पडतो की मास्तर.. बंधु म्हणजे भाऊ कसा होईल?
संसाराच रहाटगाडगं पुढे रेहटतांना कशी माय बापाची फजीती होते हे माझ्या कोवळ्या वयाला काय कळणार..? परिवाराचा पोषिन्दा होने हे काय खान्याच काम होय? पण जन्माला घातलेल्या चिलापिलांची व उभा परिवार निर्माण केल्यावर त्यांच्या खान्याची तर काळजी घ्यावीच लागेल नाही का?मात्र संसारच अर्थकारण मायबापच जानायचे हि फार कसरत असायची कारण कमावता एक बाप खाणारे पाच कुटुंबातीलच पण नातिगोती सतत ठाण मांडूनच असायची म्हणजे पाच, सहा,सात आणि दहा सुद्धा एवढा संसाराचा मांडलेला पसारा..!त्यावेळी कुठे होत “हम दो हमारे दो” च गणित..!
माय मात्र माझ्या वयाच्या अवघ्या चारवर्षी आपल्या मांडलेल्या संसाराच गणित अर्धवट सोडुन गेली, ह्या मांडलेल्या गणिताची बेरीज होईल..?की वजाबाकी..? तिने याचे उत्तर जाणून घेण्याची वाट बघितली नाही. कदाचित तीला उत्तर जाणून घेण्याचा वेळ हि मिळाला नसावा..! ती अनपेक्षित निघुन गेली मरणवाटेवर..! आणि आम्ही दुःखाच्या वळणवाटेवर.. वाट चुकल्यागत वेदनेच्या गृहगर्भात…
मी जेव्हा १९८६ ला सेमी इंग्रजीला जनता शाळेत प्रवेश घेतला त्यावर्षी शंभर वर्षाचा पाऊसाने रेकॉर्ड तोडला होता असे लोक सांगायाची.अख्या शहरात चौफेर पाणीच पाणी.जिल्यात नव्हे विदर्भ,महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा पुर सदृश परिस्थिती होती.शाळा बंद,रस्ते बंद, महामार्ग बंद आणि दुकाने पण पावसाच्या सतत सुरु असलेल्या झळीमुळे बंद, रॉकेल पुरवठा बंद मग जाम फजीती कारण आमच्यासाठी स्वयंपाकच एकमेव इंधन रॉकेल.घरी एक रॉकेलचा पितळी स्टोव होता ज्यावर आमच्या दोन सांझेची भूख भागायची, आम्ही तीन भावंड नुकत्याच नोकरीवर लागलेल्या मोठ्या भावाकडे शिकायला होतो. मग काय तर रॉकेल कुठेच नाही सरपणाची पण कुठलीच व्यवस्था नाही चूल तर नाहीच नाही. पाऊस शेतीसाठी किती आवश्यक असतो. अन्नधान्य पिकवण्यासाठी पाऊसा शिवाय कुठला पर्याय असतो ग्रामीण गरीब शेतकऱ्याकडे. पाऊस कल्पनेतल्या देवीदेवतापेक्षा श्रेष्ठ असतो. पाऊस म्हणजे जिव की प्राण असतो गरीब कष्टकरी शेतकऱ्यासाठी. पण या हंगामाचा पाऊस जिवावर उठला गरीबांच्या,शेतकऱ्यांच्या आणि बरीच प्राणहानी करू लागला होता खेड्यापाड्यांची. पाऊस पिकांना पोषण देतो आणि फळापिकांनी घरात अन्नधान्याची रास उभी होते ते माणसांना पोषण देतात आणि अन्नधान्यच माणसांची भूख भागवतात.आमची भूख कासवीस होत होती. जल हि जीवन है असे पुस्तकात वाचताना बरे वाटले होते पण आता वाटू लागले मनाला कि “बारिश भी अक्सर भूख छीन लेती है..!”
——————————————————//क्रमशः
✍️”अशांत”शेखर✍️
14/05/2022