✍️घर में सोने को जगह नहीं है..?✍️
✍️घर में सोने को जगह नहीं है..?✍️
——————————————————————-//
बालपणीच्या दुःख ,वेदना, ताप, संताप,राग आणि गालावरच्या चापटा,पाठीवरचे धपाटे फार काळ मनात घोळत नसायच्या.सार कसं क्षणात विसरून पुन्हा जैसे थे..! आपल्याच धुंदित मदमस्त होवुन पुढे जायचं आणि पुन्हा त्याच सवयी ज्याच्यासाठी वारंवार मार पडायचा तेचं कृष्णकर्म म्हणा कि कैफ म्हणा धुंधी असायची खेळाची,ते लपुन छपुन उरकायचेच.गिल्ली दंडा, कंचे, लपाछपी, सायकल चे टायर ,सळी जमिनीत गाडणे,चेंडू फेकून मारणे कधी खो खो तर कधी कबड्डी हे आमचे खेळ आणि सायंकाळी हमखास मामाचे पत्र हरवले चा सोठा मारण्याचा खेळ. ज्या दिवशी बापाची सुट्टी असेल तर तेव्हा बाबांची सायकल घेवुन गावाचा फेरफटका मारायचा. मुद्दाम आपल्या सवंगड्याना भेटिला जायचे दुरुनच वेल्हाळायाचे आपल्याला दंडयाची मोठी सायकल चालवता येते याच स्वतःलाचं भूषण वाटायच आणि इतरांना जास्तची हुशारी दाखवण्याची मज्जाच भारी वाटायची. पावसाळ्यात तलाव फुटला कि पाणी रस्त्यावर यायचे त्यासोबत मासऱ्यांचा पुर वाहत यायचा. मी गोविंद गण्या आणि शरदया सोबत बापाच्या जुन्या फाटल्या लुंगीने लहान बोटरे,टेपर्या मासोळया पकडायला पळत सुटायचा. क्रिकेट किंवा फुटबॉल हे खेळ आमच्या करीता महागडेच. कधी कुणाकडे बैट बाल दिसलीच तर तो मुलगा आमच्यासाठी श्रीमंताच पोर आणि लहान टोबु सायकल एखाद्या मुलाकडे बघितली की आश्चर्य आणि त्याच कौतुक वाटायचं.त्याचा हेवा पण वाटायचा.रात्री झोपताना त्याचाचं विचार मनात कोंदत असायचा वाटे किती गर्भश्रीमंताच पोर असावं ते.. मला कधी मिळेल अशी सायकल..?आपला बाप घेवुन देणार का?असे नाना प्रश्न मनात काहुर माजवायचे..! इवलसं पाण्यासारखं नितळ मन त्यात लई लई मोठे स्वप्न तरंगत राहायचे कधी तरी पूर्ण होण्याच्या आशेत…!
आपला देश विविधतेने नटलेला अनेक जाती,धर्म, भाषा. अनेक परंपरा,नानाविध संस्कृती,कित्येक सण दिवाळी दसरा,होळी,बकरी ईद,रमजान ईद,मोहर्रम, जयंत्या, उत्सव ,दुर्गा पूजा, गणेश उत्सव, बुद्ध जयंती, नानक जयंती ,क्रिसमस आणि किती किती मंदिर मस्ज़िद..? एकाच देवीदेवतांचे अनेक गांव शहरात अनेक मंदिर राम,अल्ला,साईबाबा, ताजुद्दीन बाबा शंकर,हनुमान, कृष्ण खुप खुप लांबच लांब सूची. वर्षाचे तिनशे पासष्ट दिवसही अपूरे पड़तील इतका सण उत्सवांचा उत्साह आणि महान देवीदेवतांच्या प्रेरणा इथल्या मानवी मनाच्या संस्कृतीमधे ठासुन ठासुन भरलेल्या,वर्षाचे तिनशे पासष्ट दिवसा पैकी निदान दोनशे दिवस हे सण,जयंती आणि उत्सवांचेच असावे.माझ्या मेंदूला नेहमी पहिला हा प्रश्न पडायचा कि आपल्या एका देशात तेत्तीस कोटि देवीदेवता मग त्यांचे उत्सव त्यौहार एकाच वर्षात पूर्ण कसे होतात बरे? दूसरा प्रश्न देवीदेवतांच्या शारीरिक रचना चार बाहु,आठ हाथ, धड वेगळे आणि बरचं काही.. हे पूर्ण मानव पण नाहीत आणि पूर्ण प्राणी पण नाहीत हा जेनेटिकल लोचा कसा?. हे कुठलं जनुक असाव? किंवा कुठलं जननेंद्रिय?.डार्विन च्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने हे माहित झाले होते कि माकडा पासुन मानवाची उत्पत्ती झाली.कधी कधी माणूस पण माकडासारख्या मर्कटलीला करतोच त्यामुळे यावर मी ठाम होतो फक्त कळत नव्हते ते तेहत्तीस कोटिचे? तीसरा प्रश्न पृथ्वीतलावरचा मानव चंद्राच्या कलेवर हि पौर्णिमेचे,अमावस्याचे उपास व सूर्याच्या नावाने व्रतवयकल्ये पाळतो हे चंद्रसूर्याला खरंच माहित असेल का? हे आज डोक्याचा ताप वाढवणारे प्रश्न असले तरी सुद्धा बालपणी मात्र गणेश उत्सवाची माझ्यासाठी धूम मजा असायची. आता पण गणेश उत्सव असतोच फक्त त्याचे स्वरुप सामाजिक न राहता आर्थिक झाले आहे असो..पण आपल्याला आज कुठलेही सोयरसुतक नाही. आपल्या राज्यात गणेश उत्सवाला विशेष महत्त्व असते. दहा दिवस चालणार उत्सव मनाला हर्षोल्हासित करायचा मोहुन टाकायचा.ते दहा दिवस म्हणजे चक्क रात्रीला जागर आणि दिवसाला घरदार सगळ काही विसरून फक्त गणपती पंडालातचं काढायचो कारण फुकटचा मिथुन चक्रवती चा हम पांच सिनेमा,बाबला मेहता ऑर्केस्ट्रा, जानी बाबुची कव्वाली,जादुगर के.लाल च्या जादुचे शो आणि सुरेखा पुणेकरांचा लावणीनृत्य तमाशा ,कधी गोट्या तर कधी पु.ल.चे विनोदी नाटक विठ्ठल तो आला आला…असे वाटे कि अल्लाउद्दीनचा चिराग कुणी तरी रगडला आणि जिनि मनोरंजनाचा खजाना खास आपल्यासाठीच घेवुन आला, मला फक्त मजेतच मजा यायची म्हणजे निखळ मनोरंजन बाकी काही नको होते. ना आपल्याला गणेश आरती माहित होती, ना पूजापाठ ना मनात कुठलाही भाव ना श्रद्धा होती. आपण या सगळ्या पाप पुण्या पासून अगदी लांबच लांब मुक्त होतो.. मी गणेश मंडळाच्या एकाही सदस्याना ओळखीचा नव्हतो, ते पण काही लक्ष दयायचे नाही म्हणजे खुप मोठा गाजावाजा असायचा आणि सगळे उनाड पोरं तिथेच हुंदळायची.पण एक मोठी पंचाइत व्हायची.. माझी झोप..! दिवसभर थकलेल लहानग शरीर कार्यक्रम पाहता पाहता पसरुन जायचं तिथेच..कारण बालपणीची झोप सहनशीलते पलिकडची असते.तिला थांबवता येत नाही.. तिला पापन्यांच्या पल्याड ठेवता येत नाही.. तिला डोळ्यांच्या बुबुळातून टाळता येत नाही..तिला शरीरा पासून दूर घालवता पण येत नाही.. शरीराला अन्नाची जेवढी गरज तेवढिच झोपेची सुद्धा.. माय मेल्यावर आपल्या झोपेची विशेष काळजी घेणारा नव्हताच कुणी म्हणूनच की काय आपल्या झोपेला शिस्त नव्हती.खा खुजा और बत्ती बुजा असा आपल्या झोपेचा प्रकार होता.बाबांची बदली झाल्यानंतर तशी हि दोन खोल्यांचेच भाड्याने घर असायचे एखाद्या नवीन शहरात. घरभाडे पण खिशाला परवडणारे नसायचे..! सावत्र आय आल्यावर बाप जरा आपल्या जगण्याचा हिशोब नीट मांडु लागला..!मी माझ्या झोपे बद्दल सांगत होतो.माझ्या झोपेला बालपणी ना कधी चटईची ,ना दरीची,ना मऊ गादीची गरज भासली.आपल्या झोपेच अजब रसायन होत डुलकी आली की बिनधास्त पहुडायच कुठे ही कसा ही…
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी मस्त ट्रैक्टर सजविला होता मंडळीनी त्यावर मोठा मंच तयार केला होता,साधारण रात्री साढ़े दहा चा सुमार असावा मुख्य मंचावर भजन कार्यक्रम सुरु होता.मात्र माझ्या झोपेचा प्रश्न उत्तर शोधत होता..मी झोपे साठी योग्य जागा हुडकत होतो ट्रैक्टर उभी होती वर चढलो तनसांच भारं पसरवुनच होते मी लगेच पसरल शरीर आणि आपण पटकन सोनेगांवला गेलो. लागलीच पहाटेला एकाने लात हाणली कमरेत आणि खेकसत शिव्या देत म्हणाला “घर में सोने को जगह नहीं है क्या..?” तेव्हा वाटले साला कुठली भक्ती यांची.. कुठला पूजापाठ..दहा दिवस पुजाअर्चा करूनही देव यांना सद्बुद्धि देत नाही माणुसकी तर नाहीच नाही.. सगळ काही थोतांड… तेव्हा तैत्तीस कोटीचं अस्तित्व कुठेच नाही आढळलं.. हा सगळा कल्पनाविश्वासाचा भोगविलास आहे.. फक्त पाखंड साधु बुवा भक्तांच… हे बाळकडू बालपणीच माझ्या मनाच्या गाभार्यात घट्ट शिकामोर्तब करुन गेलं….
————————————————————//क्रमशः
✍️”अशांत”शेखर✍️
15/05/2022