✍️अमृताचे अरण्य….!✍️
✍️अमृताचे अरण्य….!✍️
————————————//
कुठे असेल…?
आता पण त्याच
घनदाट शाल तरुच्या
गिरिवनात स्थित असेल का
अमृताचे अरण्य…?
तुला नीट सांगता येईल का
कुठल्या वाटांनी तो दिव्यप्रज्ञ
मार्गस्थ झाला होता…?
तिथेचं असेल का
अमृताचे अरण्य…?
काय नरकाच्या दाहक
गर्भगुहेतुन वाट शोधत शोधत
स्वर्गाच्या नंदवनाचे द्वार
दॄष्टि समोर येईल..सत्य आहे का?
तिथेच असेल का
अमृताचे अरण्य…?
तू कुठल्या जातक कथेत
ऐकले त्या अरण्याचे वर्णन
सांगशील का मला..?
तिथे नसतात का माणसांच्या
बोचऱ्या शब्दासारखे काटेरी झुडूप..?
तिथे होत नसतात का
अन्तःकरणाला वेदना देणारे सलं कुरूप..?
तिथे देतात का वृक्ष
तप्त उन्हात मायेची सावली..?
का कधी कुणी एखाद्याच्या दुर्धर जखमेवर
सालपर्णाची स्निग्ध लेप लावली..?
तिथल्या वृक्ष मध रसानी तहानलेल्यांची
भागत असते का तृष्णा..?
तिथल्या फुलाफळांनी पोटातल्या
चतकोर भाकरीची शमत असतेना भूख?
सोड हे सगळं नको सांगु मला..!
मला काही हि गरज नाही..
त्या बोचऱ्या शब्दांची…
त्या अन्तःकरणाच्या वेदनेची..
त्या मायेच्या सावलींची…
त्या दुर्धर जखमांची…
त्या न भागलेल्या तहानेची…
त्या न शमनाऱ्या भूखेची…
मी आता वेदनाहीन…
मी आता चेतनाहीन…
हो मी तेच अरण्य शोधतो आहे
माणुस म्हणून उरलेसुरले
थोडे आयुष्य जगता यावे म्हणून…
माणुसकीच्या पाऊलखुणावर
चालता यावे म्हणून…
हो मी शोधतो आहे तेचं
अमृताचे अरण्य….!
अमृताचे अरण्य….!
—————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
19/05/2022