✍️मी फिनिक्स…!✍️
✍️मी फिनिक्स…!✍️
—————————————-//
किती दाट गर्द अंधार रे..?
किती जड आहेत पापण्या
उघडाव्या म्हणतो…पण..!
सुर्याचे एक किरण ही
ह्या गवाक्षातुन
मला कसा प्रकाश
छेदतांना दिसत नाही…!
हा काळ अभिमन्यू असावा
सभोवतालचे चक्रव्यूह
मला कुणी योद्धा
भेदतांना दिसत नाही…!
दिवसागणिक पोलादासारखी
जड़ भासु लागलीत रे पाऊले
काळीज वजा होवु लागले
बघ छातीच्या पिंजऱ्यातून…!
आणि एक एक अवयव निकामी
देहाच्या कप्याकप्यातुन…!
मेंदूचा पार भुगा पडला
स्त्राव झिरपतो कवट्यातून..!
शरीर वाटे जणू ओसाडल्यागत
उभ्या तरुणाइत कोसळल्यागत
चेतनाचं लोपल्या चैतन्याच्या
त्या उरी झोपल्या वेदनेच्या..!
कसे विचारु तुला
जगण्याच चिरंतन सत्य..?
मी असत्याच्या वादळी
महासागरातला नावाडी..
कशी मागु तुला
किनाऱ्याची साथ..?
माझ्या दिशाहीन होळीला
तुझ्या होकायंत्राची मदत
कशी मागु…?
झोपाळलेली झापळं
खोलावलेली बूबुळं
पुन्हा सूर्यप्रकाशाला
आसावतील का…?
ह्या काळाच्या वणव्यात
वर्तमान माझा जळाला जरी..!
तरी ह्या उरलेल्या राखेतूनच
बघ स्वप्नपंख माझे
फिनिक्स बनून
भरारतील उंच आसमंती…
———————————————//
✍️”अशांत”शेखर✍️
17/05/2022