✍️✍️भोंगे✍️✍️
✍️✍️”भोंगे “✍️✍️
——————————–//
विठू आज कशी रे
चक्क पहाटे पहाटे
निवांत शांत झोप लागली…
शतका मागून शतक गेलीत
मी डोळे मिटुनच
या बेगडी दुनियेला पाहण्याचे
टाळत आले…
मी कशी अविचल.. निश्चल..
ठेवून कर कमरेवर
युगा नु युगे उभी विटेवर…
कालचक्राच्या वेदना
काळजामधे गोंजारत…
विठू आज..आज..मात्र कसा
माणसांच्या गर्दीचा वेध लागत नाही रे…!
उसासे टाकत रखुमाई म्हणाली
आज ना साहूची काकड़ आरती
ना इलाहीची नमाज पुकार ऐकली…
माणसांना खरच पडला
असावा का रे विसर..?
रखुमाइच्या प्रश्नांनी चिंतातूर विठू बोलला
एरव्ही तेत्तीस कोटीच्या तालावर
आनंदाचे मृदंग टाळ कुटुन
विनाशाचे ढोलताशे बडवून
आपलेही माणुसपण हिरावुन
त्राहि त्राहि माजवणाऱ्या भक्तांना
सद्बुध्दि कशी सुचली असेल गं…?
कुणाच्या हितासाठी हा उपदव्याप?
की मग समाजविघातक षडयंत्र…
रखुमाई म्हणाली विठू तुझे तर सताड़
डोळे उघड़े असतात ना
तुला कस कळत नाही रे…!
अगं रखमा उभी हयात गेली
थोरामोठ्यांची माणसांना समजावतांना
कि धर्मासाठी माणुस नसतो
माणसांसाठी धर्म असतो…(?)
आज भोंगे बंद असले जरीही..
ऎकु येतो ना धर्मवेड्यांचा
सनातनी कर्कश कल्लोळ…
बघ कसा घुमतोय आसमंती…
रखुमाई बोलली
विठू विज्ञानाच्या कलेवर प्रगती करणाऱ्या
सुसंस्कारित मानवांचा आदिमपणा
मला अजुनही जाणवतो रे…!
मला अजुनही जाणवतो रे…!
——————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
05/05/2022